Tuesday, October 2, 2007

जे जे उत्तम...

सर्व प्रथम नंदनचे मन:पूर्वक आभार मला tag केल्याबद्दल !

मला हा उपक्रम आवडला आहे. इतक्या आवडीच्या परिच्छेदातून
एकाची निवड करणे अवघड काम होते. मला पाच परिच्छेद आणि
एक व्यक्ती tag असे खरंतर चालले असते. :)

...

काय विलक्षण मजबूत पिंजरा ! किती इतरांपासून तोडतो, वेगळा पाडतो !
लहानपणी कुणी मला ’अभय’ नाव दिलं तेव्हा, त्याचा वारंवार उच्चार ऐकला
तेव्हा, या अभयचं लोकांनी विविध प्रकारे वर्णन, मूल्यमापन केलं तेव्हा या
पिंजऱ्याचा एक एक गज ठोकला जात होता. प्रत्येक गज मला इतरांपासून,
विश्वापासून वेगळं करत होता. आणि नकळत बनत आलेला हा पिंजरा आता
तोडता तुटत नव्हता.

मला असं वाटायला लागलं की ज्ञान आणि ध्यान मार्गातून मिळणारं पांथेय
आवश्यक व महत्त्वाचं असूनही चित्तशुध्दीसाठी, मन निर्मळ, उदार व विनयी
करण्यासाठी जोडीला प्रेम व भक्तीची भावना हवी ! सतत व्यापकतेची भावना
व्हायला उपायही भावनेचा हवा ! प्रेम हे माणसाला व्यक्तिगत स्वार्थाच्या
पिंजऱ्यातून सोडवून इतरांशी जोडतं, व भक्ती ही विश्वाशी, ईश्वराशी जोडते !
ज्ञानाचं व ध्यानाचं शेवटी सतत भक्तीत रुपांतर होणं आवश्यक आहे.
त्यानेच "अणुरेणु या थोकडा, तुका आकाशाएवढा" होऊ शकेल.

माझ्या बुध्दीला उत्तर मिळालं तरी मनाला अजून समाधान नव्हतं. ही तळमळ
का निर्माण होते आहे? कसली कमतरता आहे? माझा अंतरात्मा अजून शोध
घेतच होता.

Eric Frome ह्या जगप्रसिध्द मानसशास्त्रज्ञाची दोन पुस्तकं Man for himself
आणि Art of loving ही जणू आध्यात्मिक पुस्तकंच आहेत. तो म्हणतो,
की वनस्पती व इतर प्राण्यांसारखा मानव देखील सृष्टीचा अबोध भाग होता
तोपर्यंत त्याला अडचण नव्हती. पण मानवाच्या विकासाच्या दरम्यान आपण
निसर्गापेक्षा वेगळं काहीतरी आहोत हे ज्या क्षणी त्याला जाणवलं, त्या क्षणी
तो वनस्पती व प्राण्यांपेक्षा खूप उंच झाला; व त्याच क्षणी तो जाणिवेच्या
पातळीवर सृष्टीपासून वेगळा झाला. सृष्टीमातेच्या गर्भातून मानसिक दृष्ट्या
असं बाहेर आल्यावर आता त्याला एकटेपण, वेगळंपण, तुटल्याची वेदना छळते.
पण परत तो मातेच्या गर्भात जाऊन पूर्वीची अबोध अवस्था प्राप्त करू शकत नाही.
त्याला परतीचा रस्ता नाही. त्याला फक्त पुढे जाता येईल. या तुटलेपणाचं,
एलिअनेशनचं उत्तर शोधणं हाच माणसाचा >सर्वात मोठा आध्यात्मिक प्रश्न आहे,
असं तो मानतो.

तो पुढे म्हणतो की ’प्रेम’ हे या तुटलेपणावर उत्तर आहे. एकटा पडलेला
मानव प्रेमामुळे इतर मानवांसोबत जुळतो व त्याचा मूळ प्रश्न सुटतो. म्हणून
प्रेम ही मानवाची मूलभूत गरज आहे, भूक आहे. मानवा-मानवामधील प्रेम,
मानव व प्राण्यांमधील प्रेम, मानव व सृष्टीमधील प्रेम हा त्याच्या एलिअनेशनवर
उपाय आहे.

आधुनिक माणूस हा मिडाससारखा आहे. विज्ञानाचा परिसस्पर्श लागल्याने हात
लावील तेथे तो समृध्दी निर्माण करतो. पण त्याची मुलगी - भावना - त्याला
दुरावली आहे. नातेसंबंध तुटलेले आहेत. म्हणून तो भावनात्मक दृष्ट्या भुकेला,
तहानलेलाच आहे. यश, प्रगती किंवा समृध्दी या मृगजळामागे धावूनही तहान
भागत नाही. कारण तहान प्रेमाची आहे, संबंधाच्या अनुभवाची आहे.

लोहचुंबकाच्या तुटलेल्या उत्तर ध्रुवाने दक्षिण ध्रुव शोधावा तसं माणूस वेगवेगळ्या
पातळीवर जोड शोधत असतो. स्त्री-पुरुषांचं प्रेम,मित्रा-मित्रांच प्रेम यामध्ये त्या
पोकळीचं उत्तर मिळतं. या दृष्टीकोनातून पाहिलं, तर सगळी आध्यात्मिक साधना
ही असाच शोध आहे. योग हा शब्दच मुळी ’युज’ या संस्कृत धातूपासून निर्माण
झाला आहे. ’युज’ म्हणजे जुळणे. योग व ध्यान देखील माणसाला एकरुपतेचा
अनुभव देऊन तुटलेपणातून सोडवतात.

जीवन म्हणजे लागोपाठ घडणाऱ्या संबंधांच्या अनुभवांची मालिका आहे.
व्यक्तींसोबत, वस्तूंसोबत, ध्वनीसोबत, स्मृतींसोबत, कल्पनांसोबत माझा
संबंध घडतो. तो अनुभव मला प्रिय वाटतो. जीवन म्हणजे संबंधांचाअनुभव.
हवंहवंसं वाटतं ते शरीर नाही, वस्तू नाही त्यांच्या मार्फत मिळणारा संबंधाचा
अनुभव.

आता थोडा अर्थ उलगडायला लागला. हा संबंध किंवा प्रेम माणसाला
एकलेपणाच्या कैदेतून त्या क्षणापुरता मुक्त करतो. म्हणूनच तो माणसाला
हवाहवासा वाटतो, नव्हे आवश्यक ठरतो. संबंध, अनुबंध, प्रेम नसलं की
माणसाचं जीवन हृदयहीन चोथा होतं, व तो त्या ताणाने मरतो. प्रेमाची
शक्ती म्हणजे वरदानच म्हटलं पाहीजे. अन्य कुणी आपल्यावर प्रेम करेल
हे तितकंसं आपल्या हाती नाही. पण आपण प्रेम करणं आपल्या हाती आहे.
म्हणजे जगण्याची चाबी आपल्याच हाती आहे !

काहींना ही प्रेम करण्याची शक्ती प्राप्त असते. ते सहज इतरांशी भावनिक
अनुबंध जोडू शकतात. त्यांचा प्रश्न तात्काळ सुटतो. पण बहुतेकांनी ही शक्ती
गमावलेली असते. मी, माझं, मला ह्या त्रिसूत्रीच्या जपामध्ये मी इतरांपासून
वेगळा पडलेला असतो. ’मी’ ला विसरून किंवा पार करून ’अन्य’ सोबत
एकरूप होण्याची प्रेमाची शक्ती ज्यांना नाही, त्यांचा उध्दार कसा?

हा प्रश्न माझ्यासाठी निव्वळ तात्विक नव्हता. माझीच ती समस्या होती.
वर्षानुवर्षे मला छळणारी ती जाणीव होती. माझा उध्दार कसा?

भारतीय अध्यात्म विकसित करणारे माझ्यासारखेच शापित असावेत. त्यातूनच
त्यांनी विश्वासोबत एकरूपतेचा मार्ग शोधला असावा. ’मी’ नावाच्या पिंजऱ्यातून
सुटकेचा एक मार्ग आध्यात्मिक जाण व दुसरा मार्ग प्रेम हेच आहेत.
आध्यात्मिक जाण बौध्दिक पातळीवर ज्ञान मार्गाने, जाणिवेच्या पातळीवर
ध्यान मार्गाने व भावनिक पातळीवर भक्ती मार्गाने निर्माण होते. ज्याची
जशी शक्ती, प्रकृती तशी
मुक्तीची चाबी त्याने वापरावी व ’ मी’ च्या पिंजऱ्यातून सुटका करून घ्यावी.
...


माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ अभय बंग
...

मी ज्यांना खो देते आहे त्यांची नावे
प्रकाश
प्रिया
शैलेश
शमा
अदिती

5 comments:

Nandan said...

ya tagging chya khelat sahabhagi zalyabaddal dhanyawad, kshipra. utara chhan aahe. khas karun
या दृष्टीकोनातून पाहिलं, तर सगळी आध्यात्मिक साधना ही असाच शोध आहे. योग हा शब्दच मुळी ’युज’ या संस्कृत धातूपासून निर्माण झाला
आहे. ’युज’ म्हणजे जुळणे. योग व ध्यान देखील माणसाला एकरुपतेचा अनुभव देऊन तुटलेपणातून सोडवतात.-- ha bhag vishesh aavadla.

Mints! said...

क्षिप्रा, सुरेख आहे ग निवडलेला उतारा.

TheKing said...

Amazing book and lovely paragraph!

Raj said...

परिच्छेद अतिशय आवडला. वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांच्या यादीत भर पडली. :)

Shailesh S. Khandekar said...

छानच आहे उतारा! मला खो दिल्याबद्दल धन्यवाद!:)

शैलेश