मातृभाषा म्हणून मराठी प्रिय असली तरी देखील ही भाषा शिकतांना
इतरांचे काय हाल होतात ते खालील उता-यात वाचायला मिळेल.
...
इकडे यायच्या अगोदर मला भारताबद्द्ल फारसे काही माहीत नव्हते. पण हा देश
शांतताप्रेमी आणि अहिंसावादी आहे अशी माझी ठाम समजूत होती. महात्मा गांधींचे
चरित्र, थोडेसे हिंदू तत्वज्ञान आणि टी. एस. एलियटचे वेस्टलॆन्ड (ओम शांति:
शांति: शांति:) वगैरे वाचल्यामुळे ही कल्पना झाली असेल. इकडे आल्यानंतर मी
प्रथम हैद्राबादला राहायला गेले. तिथे माझ्या पूर्वीच्या कल्पनांना फारसा धक्का
लागला नव्हता; पण माझा मराठीचा अभ्यास सुरु झाला तेव्हा माझा पूर्ण
भ्रमनिरास झाला.
अगदी पहिल्याच दिवशी माझे मराठीचे शिक्षक म्हणाले. " मी सातारा जिल्ह्यातला
आहे. आमच्या जिल्ह्याचे लोक मारामारीसाठी प्रसिध्द आहेत. ’मी तुला मारीन’
याला मराठीत अनेक वाक्प्रचार आहेत - ’मी तुला तुडवीन’, ’मी तुला वाजवीन’,
’ तुझं नरडं दाबीन’, ’तुझ्या नरड्यावर पाय ठेवीन’ इत्यादी इत्यादी."
सुरुवातीला मला वाटले, की हा भांडखोरपणा फक्त सातारा जिल्ह्याचे वैशिष्टय आहे.
हळूहळू मात्र माझ्या लक्षात यायला लागले, की ही वृत्ती मराठी भाषेतच भिनलेली
आहे. बाळबोध लिहीबरोबरदेखील हिंसेचे बाळकडू पाजले जाते - अक्षरांचे पाय
मोडणे, पोट फोडणे. (आणि पुढे तर ध चा मा करुन काय झाले ते इतिहासाच्या
वर्गात शिकवले जाते.)
केवळ अक्षरांच्या बाबतीत ही स्थिती, तर सामाजिक व्यवहाराची काय कथा? ’नाक
दाबले तर तोंड उघडते’, ह्यांसारख्या म्हणींमध्ये तर उघड हिंसाचार दिसतोच, पण
एरव्ही सुध्दा काय होतं ते पहा. नुसता दोष देऊन पुरेसे समाधान न होता लोक
अमक्याचे खापर इतरांच्या माथी फोडतात. त्यांना धारेवर धरतात. राजकारणी लोक
एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसतात. न्हावी नसलेली माणसे लोकांची
बिनपाण्याची हजामत करतात आणि भांडवलदार कामगारांचे रक्त आटवतात !
रोजच्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये लोक एकमेकांच्या पोटावर पाय ठेवतात किंवा
एकमेकांचे पाय ओढतात. आई बाप लहान मुलांचे कान उपटतात आणि मुले
मोठी झाल्यावर आई बापांच्या डोक्यावर मिरी वाटतात.
ही झाली अप्रत्यक्ष भांडणाची उदाहरणे. मग उघड उघड भांडण सुरु झाले की भाषाही
एकदम भडकते ! तळपायाची आग मस्तकाला जाते, माणूस दात-ओठ खातो,
आपले तापलेले हात थंड करुन घेतो आणि शिव्या द्यायला हपापलेला जीव भरपूर
तोंडसुख घेतो.
नवलाची गोष्ट म्हणजे हा हिंसाचार फक्त इतरांच्याच विरुध्द असतो असे नव्हे -
स्वत:विरुध्द लोक तितकेच हिंसक असतात. झोपेतून उठल्यावर अंग मोडतात,
गप्पा मारता मारता बोटे मोडतात, घसाफोड करतात, तोंड फाटेस्तोवर बोलतात.
आपली एकुलती एक मुलगी प्रेमविवाह करणार आहे असे कळल्यावर आई बाप
घर डोक्यावर घेतात.
भांडखोरपणाबरोबरच मराठी भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे शरीरशास्त्राविषयीच्या
अद्भुत कल्पना. जिभेला हाड असणे ही चांगली गोष्ट समजली जाते. लोकांचे
हातपाय गळतात, त्यांच्या काळजाचे पाणी होते, त्यांच्या तोंडचे पाणी पळते,
त्यांच्या पोरांना पंख फुटतात, शिंगे फुटतात. ज्याला तिसरा डोळा फुटतो तो
माणूस आदरणीय समजला जातो.
मराठी माणसांना होणारे रोग तर अनाकलनीय आहेत. लोकांचे तोंड येते (ते गेले होते
कुठे?), डोळे येतात. झोपडपट्टीतल्या मुलांच्या जिवाला येते (नेमके काय येते देव
जाणे), कोणी वेड्यासारखे वागायला लागले की, त्याचे डोके फिरले किंवा डोके हलले
असे म्हणतात.
शरीराबद्दल विचित्र कल्पना आहेतच, तर खाण्याबद्द्ल तर काही विचारुच नका.
मराठी माणसे वाट्टॆल ते खातात- बोलणी खातात, डोके खातात, वेळ खातात, मार
खातात, अक्षरे खातात. चेकोस्लोवाकियामध्येही ही अक्षरे खाण्याची प्रवृत्ती आढळते.
एका चेक गोष्टीमध्ये ’ एक मुलाने इतकी अक्षरे खाल्ली होती, की त्याच्या पोटावर
शस्त्रक्रिया करुन अक्षरे काढावी लागली,’ असे वाचल्याचे आठवते. पैसे खातात.
(शेणही खातात असे मी ऐकले आहे.)
मग ही राकट, दांडगट, शरीरशास्त्र आणि तर्कशास्त्र ही दोन्ही न जुमानणारी भाषा
परकीय माणसाने शिकायची कशी? कधी कधी या विचाराने मी वैतागून जाते. मग
ही भाषा थोडी का होईना, माझ्यावर कृपा करुन (मला) यायला लागली आहे, या
सुखद विचाराने माझा जीव भांड्यात पडतो.
...
डॊ मॆक्सिन बर्नसन
भाषातज्ञ, शिक्षिका, लेखिका
अमेरिकेत जन्मलेल्या मॆक्सिन बर्नसन ह्यांनी मराठी माध्यमाची शाळा फलटण येथे
सुरु केली आहे. त्या प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत. वय ७५ वर्षे.
भारतातील वास्तव्याचा काळ ५० हून अधिक वर्षे..
वरील उतारा ’वाचू आनंदे’ (संपादन - माधुरी पुरंदरे) कुमार गट २ ह्या पुस्तकातील आहे.
Saturday, November 3, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
सुंदर !
chhaan aahe utara. rakat desha chya chalivar rakat bhasha, kaNakhar bhasha, dagaDanchihi bhasha mhanave lagel :)
yavaroon pu lancha ek vakya aathavala -- "tya tya bhashetale vak-prachar tya lokancha swabhav darshavataat. Marathi natak kampanyanchi bhasha dekheel company solapur padakrant karun pune, nashik, jalgao chya zanzavati dauryavar yet aahe, ashee asate."
nice post
क्षिप्रा तुझा सर्व ब्लॊगच खूप वाचनीय आहे. अगदी सुंदर भाषेत विचार मांडले आहेस सगळे आणि कविता तर सुंदरच!
हा उतारा वाचायला हवाच असा आहे. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
कविता अगदी सुंदर आहे.
धन्यवाद.
लेखिकेचं नाव, व्यवसाय आणि पुस्तकाचं नाव हे सारे संदर्भ दिलेस हे बरं केलंस. नाहीतर ह्या उताऱ्याच्या खरेपणावर विश्वास बसत नव्हता इतका तो पॉलिश्ड आहे! म्हणजे कुण्या मराठी सॉफ़्टवेअर वाल्यानेच फ़ावल्या वेळात डोकं लढवून फ़ॉरवर्डेड ईमेल्सची चेन सुरू करायच्या उद्देशाने लिहून काढल्याची शंका यावी इतका. :) सहीचेय! :)
लय म्हणजे लयच भारी
जबरी आहे गं... एक न् एक शब्द खराय :)
Farach Apratim...!!!
Post a Comment