Sunday, July 19, 2009

झाडॆ - मातीच्या मनातील कविता

दोन तीन वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला.

एक मोकळी शनिवार संध्याकाळ होती. त्याच दिवशी सकाळी वाचलेली कार्यक्रमाची एक जाहीरात नावाच्या वेगळेपणामुळे नजरेत भरली होती. नाव होते ’झाडे - मातीच्या मनातील कविता’. कविता हा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे स्नेहसदन येथे गेले आणि अचानक एक अतिशय सुरेख कार्यक्रम बघायला मिळाला. १०० वर्षातील ’झाडे’ ह्या विषयावरच्या कविता एकत्र करुन त्याचे सादरीकरण केलेले होते. केवळ अप्रतिम सादरीकरण होते. मला तो कार्यक्रम इतका आवडला की त्य़ानंतरचा एकही कार्यक्रम मी चुकवला नाही. कार्यक्रम पाहून काही आवडत्या कविता पाठ झाल्या. विशेष आवडलेल्या कविता म्हणजे जॆकरांडा, एक रोपटॆ तगून आहे, झाड वाजते मनात, नितळ तळ्याच्या काठावरती.

पुण्याच्या TACT ह्या ग्रुपने तो सादर केला होता. आनंद चाबुकस्वार, प्रदिप वैद्य, रुपाली भावे आणि अश्विनी गिरी इतकीच नावे आज आठवत आहेत. मूळ संकल्पना आनंदची होती. मी पुढे आनंदकडून ती संहिता मागून आणली. त्या सर्व कविता लिहून घेतल्या. त्यातल्या काही कविता आज देत आहे.

...

नुस्ती नुस्ती राहतात

प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी गाणे गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो

गाणे गातात
देणे देतात
झडून जातात
उडून जातात

झाडे नुस्ती नुस्ती
नुस्ती राहतात

- आरती प्रभू (दिवेलागण)

...

हे एक झाड आहे

हे एक झाड आहे : याचे माझे नाते
वार्‍याची एकच झुळुक दोघांवरुन जाते

मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधूने उमटणारे जाणीवओले भास

पहिल्यानेच याची मोहरतांना फांदी
ठेवली होती बाळगाणी याच्या कटिखांदी

मातीचे झाड : झाडाची मी : माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती

ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल

कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन

शान्ता शेळके (किनारे मनाचे)

...

एक झाड
त्याच्या प्रेमातलं
दुसरं झाड
मध्ये फक्त
न संपणारी
जमीन !

सदानंद रेगे (हायकू विशेषांक)

...

झाडं

झाडं माझ्या मनातली फुलं स्वत:वर फुलवणारी
माझ्या मनातल्या हिरव्यानं रंगणारी
झाडं माझं पानगळतीचं दु:ख सोसणारी
माझ्यासंगे व्याकुळ होऊन मिटून बसणारी
झाडं हिमालयातली: आकाशात चढणारी,
सह्याद्रीच्या दरीतल्या वारल्यांशी भिडणारी
झाडं खिडकीतून दिसणारी, रेल्वेतून पळणारी
फटीतून डोकावणारी, पायातून घुटमळणारी
झाडं रस्त्यावरली, पलिकडली, देवळातली
नदीकाठची, अलिकडली, डोळ्यातली
झाडं दुरुनच जवळ घेत मनाला शांतवणारी
खुज्या मनाला आभाळवेड लावणारी !

- पद्मा (श्रावणमेघ)

...

झाडावर त्याच्या फुले

झाडावर त्याच्या फुले फुलतच नव्हती
तशी त्याने खूप मनधरणी
केली होती झाडाची
सदैव त्याचे तळहात बरबटलेले

अलीकडे दोनचार पक्षीही फिरकून गेले होते
ॠतूच्या शेवटाला
ॠतूचे बदलणे म्हणजे झाडातील पानांवर
लिहीलेले रेषांचे नशीबच...

शेवटी बरबटलेल्या हातांनी
नाइलाजानेच तो स्वत:कडे वळला
आत्मसुखासाठी
आणि त्याने स्वत:चीच मशागत सुरु केली

तेव्हा
सारे झाडाचेच गुणधर्म त्याच्यात रुजलेले
त्याने पाहिले
...आणि मग तो सुखी झाला

- नितीन तेंडुलकर (पावसाळा)

7 comments:

Nandan said...

वा! सुरेख आहेत कविता. तुम्ही मागे प्रतिक्रियेत या कार्यक्रमाचा उल्लेख केला होता, तेव्हापासून त्याबद्दल उत्सुकता होतीच. ह्याचे प्रयोग/सादरीकरण अजूनही होतात का? किंवा या कार्यक्रमाची कॅसेट/सीडी उपलब्ध आहे का?

Kshipra said...

नंदन,

प्रयोग होत नाहीत. सीडी नसावी असा अंदाज आहे पण नीट चौकशी करुन सांगते.

Pradeep Vaiddya said...

मी प्रदीप ... ''झाडे ..'' च्या समुहापैकी एक. ''झाडे''चे प्रयोग आता होणं जरा कठीणच दिसतंय ... आमचे प्रयत्न चालू आहेत पुन्हा वेळ काढून एखादा तरी प्रयोग करायचे .. पण .. आम्ही सगळेच आता विविध नाटकान्मधे - कामान्मधे अडकलोय .. प्रयोग होणार असेल तर मी तुम्हाला कळवीन ..

The Wanderer said...

हाय क्षिप्रा :) मी झाडे मधली रुपाली भावे. तुझ्या झाडे च्या आठवणी वाचून फार छान वाटलं. धन्यवाद. झाडे पुन्हा सादर करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. पाहू कधी यश येतंय. तुझ्या blog मधील काही posts वाचल्या. Curious Paradox फार छान आहे...आणि अर्थातच करायला अवघड :) पुन्हा भेटू.

Kshipra said...

प्रयोगावरोबर VCD चा विचार देखील करायला हरकत नाही. म्हणजे पुण्याबाहेरच्या लोकांना देखील बघता येइल.

curious paradox, rogerschya 'on becoming a person' ह्या पुस्तकातील आहे.

HAREKRISHNAJI said...

सुरेख

पराग वसेकर said...

Suresh aahet kavita. Snehsadanmadhye ajunhi changle karyakram hot asavet. Mi snehsadan ethe miss karato. Punyat asatana baryapaiki 'padik' asayacho.