Wednesday, July 29, 2009

(संशयित) कविता

एखादी (संशयित) कविता
तू वाचली की
माझी रवानगी ताबडतोब होते
आरोपीच्या पिंज-यात.
प्रत्यक्ष आणि आडून विचारल्या जाणा-या
प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देणे
एवढंच असतं माझ्या हातात !
गीतेवर हात ठेवून सांगावसं वाटतं तुला
कवितेतला ’ तो’ तूच आहेस म्हणून
पण सांगून उपयोग होणार नसतो
मिटल्या ओठांची माझी अबोल निष्ठा
तुझं तुला उमगेपर्यंत वाट पहायची ठरवते.
पण तसं काही होत नाही फक्त तुझी
तात्पुरती खात्री होते
(संशय फिटत नाही तुझा)
मग माझी सुटका होते पॅरोलवर
पुढची (संशयित) कविता तुझ्या हाती लागेपर्यंत !

1 comments:

Samved said...

किती अवघड आहे कवी असणं!