Wednesday, May 18, 2011

व्यथा मन्मनीची

व्यथा मन्मनीची कुणाला कळावी
तुझी दूरता गे कशी मी सहावी

किती सूर्य आले किती चंद्र गेले
तुझे नाव श्वासातुनी गुंतलेले
मुक्या वेदनेला न वाचा फुटावी

कसा रोज हा मेघ ओथंबलेला
तुझा ध्यास देहीमनी लागलेला
कटाक्षी तुझ्या आर्त प्रीती दिसावी

नको तीर तो अन नको खोल जाणे
उरो फक्त आता प्रवाही रहाणे
कृपेची तुझ्या पापणी ना मिटावी

4 comments:

Samved said...

छानए. गण, वृत्त, छंद जे काय असतं ते काय म्हणे याचं?

नको तीर तो अन नको खोल जाणे
उरो फक्त आता प्रवाही रहाणे
हा भास की विरोधाभास? एकाच वेळी चल आणि अचल असण्याचं मागणं मागते आहेस...

Kshipra said...

thanx वृत्त भुजंगप्रयात

नको तीर तो अन नको खोल जाणे
उरो फक्त आता प्रवाही रहाणे

काहीच नकोसे वाटते आहे. फक्त प्रवाह जसा नेईल तसे वाहाणे असावे

a Sane man said...

नेहमीप्रमाणे ओघवतं. शेवटच्या कडव्यावर गालिबचा शेर आठवला (भाव तोच आहे असं नाही, पण आठवला म्हणून.) -

कोई मेरे दिल से पूछे तेरे तीर-ए-नीमकश को
ते ख़लीश कहाँ से होती जो जिगर के पार होता

छान!

Abhijit Bhatlekar said...

रुतणारी कविता आहे.